top of page
Search

तिचं जाणं

माणूस जीवन का संपवतो? खरंतर माणसाला जीवन का संपवावंसं वाटतं? श्वास संपला की सगळं संपतं का? काय काय आत दडवून ही माणसं श्वास घेणं थांबवत असतील?

कालपासून फक्त हाच विचार आहे. खरंतर जिनं तिचं जीवन संपवलं ती माझ्या नात्यातली नाही. माझ्या फार जवळची, रोज भेटणाऱ्यातलीही नाही. पण तरी ती मला माहित होती. स्वभावानं छान होती. कधीही खूप ओरडून बोललेलं ऐकलं नाही. सतत सर्वांची विचारपूस करणारी. माझ्या बायकोची तशी चांगली मैत्रीण. पण नेमकं गेले काही दिवस त्या दोघींचं बोलणं झालं नव्हतं.

आता हिनं असा अचानक परतीचा रस्ता धरला. तिला कुमारवयातली दोन मुलं आहेत. नवरा आहे. त्या मुलांच्या विचारानंच कालपासून माझं डोकं सुन्न झालं आहे. मुलांना तो बाप काय काय सांगून समजावत असेल? ती मुलं प्रश्न तरी विचारत असतील की नुसतीच कोषात गेली असतील? आपली आई आता नाहीये, कधीच भेटणार नाही हे त्यांच्या आता लक्षात आलं असेल कदाचित. कारण तिला जाऊन जवळजवळ महिना झालाय. मला काल ही बातमी समजली. तिचे आईवडिल अजून हयात आहेत. असंख्य धक्के पचवत इथपर्यंत आलेल्या त्या दोघांना हा धक्का तर अनपेक्षितच. त्यांच्या मनावर, शरीरावर या आघातानं काय भयंकर बदल झाले असतील? त्यांचं आयुष्य कमी झालं असेल का?

अशी किती दुःख आतल्याआत दडवून त्यावर आपल्या हसतमुखपणाचं कुलूप लावून बसली होती कुणास ठाऊक? तिच्या जाण्यानं म्हटलं तर समाजात कुणालाच फरक पडणार नाही. कुणाच्या येण्याजाण्यानं कधी फरक पडतो? पण तिच्या जाण्यानं तिच्या उदरात राहिलेल्या त्या जीवांच्या आयुष्यातलं काहीतरी संपलंय. आईसारखं कुणीच नसतं हे आई गेल्यावर कळतं, हे कळायचंयही त्यांचं वय नाही अजून. नुकतंच तारूण्याच्या उंबरठ्यावरच्या त्या दोघांनी आईवर कधी रागही काढला असेल. तिला कसंही बोलले असतील. या वयातले सगळेच जण तसं बोलतात. तिला कदाचित क्षणभर वाईटही वाटलं असेल की या दोघांना जन्माला घालायला मी इतक्या यातना सोसल्या त्या याचसाठी का. पण शेवटी आईच ती. मुलांनी भूक लागल्याचं सांगितल्यावर सगळं विसरून त्यांना गरम स्वयंपाक करून वाढला असेल. आता ती मुलं भूक लागली म्हणून कुणाला सांगणार आहेत? आणि जरी कुणाला सांगितलं तरी आईसारखं गरम करून कोण देणार आहे? आईच्या जाण्याचं दुःख आणि त्यातही स्वतःहून जीवन संपवल्याच्या धक्क्याचं ओझं त्या मुलांनी कसं आयुष्यभर घेऊन जायचंय? हे कळण्याचं त्यांचं वयही नाही.

ती जर नैसर्गिकरित्या जग सोडून गेली असती किंवा अपघातात दगावली असती तर कदाचित हा त्रास मला कमी झाला असता. तिला माहिती होतं की आपली ही मुलं आता कायमची पोरकी होणार. सर्वाधिक माया करणारं एक माणूस त्यांच्या आयुष्यातून कायमचं जाणार. तरी तिला जीवन संपवावंसं वाटावं? इतकं काय घडलं असेल. कदाचित कुणाला तरी या प्रश्नांची उत्तरं माहित असतील. कदाचित कुणालाच नाही. आणि जरी त्या मुलांना जरी ती उत्तरं कळली, त्यातलं गांभीर्य कळलं तरी त्यांचा असा काय अपराध झाला होता की त्यांच्या आईनंच त्यांना असं या जगात सोडून स्वतः ठरवून निघून जावं?

काही गोष्टींची उकल नाहीच होत. भुंगा बनून आयुष्यभर मेंदू पोखरणाऱ्या त्या काही गोष्टींत या अजून एका गोष्टीची भर पडली आहे.


अमोल बक्षी

 
 
 

Comments


bottom of page