top of page
IMG_3053_edited.jpg

नमस्कार

मी अमोल बक्षी.

अमोलबोल हा उपक्रम सुरू करण्यामागे विचार होता - आयुष्य सोपं करूया. आनंदानं जगूया.

इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, ब्लॉग्ज, पुस्तके, पॉडकास्ट, व्याख्याने या सगळ्यांमधून हाच संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न सुरू आहे.

अमोल बोल

जगण्यासाठीच्या अटीतटीच्या लढाईत रोज विजयी होणाऱ्या तुम्हां प्रत्येकाला माझा सलाम!

आपण जन्माला आलो तेव्हाचं आयुष्य आपल्यासाठी सोपं होतं. पण जसजसं आपण मोठे झालो तसतसं हे जगणं अधिकाधिक कठीण होऊ लागलं. आपल्यापेक्षा आपण इतरांसाठीच जगतोय असं आपल्याला वाटू लागतं आणि आपल्या जगण्यातली गंमत हळूहळू संपत जाते. आला दिवस ढकलायचा एवढंच आपण करू लागतो. ज्या गोष्टी कधी आपल्याला मनापासून आवडायच्या त्या केवळ उपचार म्हणून आपण करतो. त्यातला आनंद आपल्यासाठी नाही, असं स्वत:ला बजावून बजावून सांगतो. आपण आयुष्य रेटतो. जगत नाही. 

अशाच सर्वांसाठी काहीतरी करावं, यातून अमोलबोल या संकल्पनेचा जन्म झाला. इन्स्टाग्रामवर मागच्या वर्षी मी अमोलबोल मराठी हे पेज सुरू केलं. आयुष्य सोपं करून आनंदानं जगण्याविषयीच्या छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करू लागलो. त्या तुम्हाला आवडल्या. तुम्ही त्यांचं स्वागत केलं आणि आज हे इन्स्टाग्राम आणि फेसबुकचं कुटुंब दीड लाखाच्या आसपास मोठं झालंय. या प्रेमाबद्दल मी ऋणी आहे.

स्वत: लेखक असल्यानं प्रत्येक गोष्टीकडं भावनिक दृष्टीनं पाहतो. त्यात जाहिरातपट बनवत असल्यानं तर्काच्या आधारावर त्याच गोष्टींची दुसरी बाजूही पाहायची सवय लागली. यातून एक लक्षात आलं की आयुष्य सोपं नाही. पण जगणं सोपं करू शकतो. कुठंतरी आपल्या विचारांतून आपण लोकांच्या मनात आनंदाची पेरणी करू शकतो. कुठं कुणाचा ताण हलका करू शकतो. कुणाला तरी आपल्या अनुभवातून मदत करू शकतो. आज जेव्हा अनेक जण मेसेज करून, मेल करून सांगतात की त्यांना या व्हिडीओज् चा कसा फायदा झाला, तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं. देवानं माझा या कामासाठी उपयोग केला, याबद्दल मी त्याचा ऋणी आहे.

 

लवकरच मी आपल्यासाठी काही पुस्तके तसेच पॉडकास्टही घेऊन येत आहे. त्यांचेही तुम्ही स्वागत कराल यात शंका नाही. 

bottom of page