मीच माझ्यासाठी - I am enough
- Amol Bakshi
- Apr 25, 2024
- 4 min read
"The only limit to our realization of tomorrow will be our doubts of today." – आज जर आपण स्वत:वर विश्वास ठेवला नाही तर आपला उद्या कधीच चांगला नसणार - फ्रँकलिन रूझवेल्ट.
I am enough. मी एकटा पुरेसा आहे. मी एकटी पुरेशी आहे. येऊ देत कितीही वादळं. येऊ देत कठीण प्रसंग. ते मला तोडून टाकायचा प्रयत्न करतील. मी पुन्हा उभा राहीन. मी पुन्हा त्यांना तोंड देईन. मला कुणाकडून कसलीच अपेक्षा नाही. कारण मी एकटा पुरेसा आहे. माझ्यासाठी माझी एकट्याची साथसोबत पुरेशी आहे. मी एकटा आहे. कारण मी ठरवलंय की मी एकटं राहायचंय. मी ठरवलंय एकट्यानं लढा द्यायचा. एकटा असेन. मी एकाकी नाही. एकटं पडणं हे संकट आहे की संधी?

I am enough. मी पुरेसा आहे. पण हे आपण कधी म्हणू शकू? जेव्हा आपल्यात हा विश्वास आहे की आपण पुरेसे आहोत. हा आत्मविश्वास येणार कसा आणि कधी? आता त्यासाठी काही गोष्टी तर मिळवाव्या लागतीलच ना? या गोष्टी खूप महाग आहेत हा? या गोष्टींची किंमत खूप मोठी आहे. तर आधी वाचून घ्या की या गोष्टी कोणत्या.
शिस्त हवी म्हणजे हवीच:
सगळे मित्र पार्टीला निघालेत. तुम्हालाही जावंसं वाटतंय. संध्याकाळच्या वेळची पार्टी आहे. तिथं बाकीचेही लोक असतील. त्यातले काही तुम्हाला आवडतही असतील. तुम्हाला जायची इच्छा आहे. पण... पण नेहमीप्रमाणे तुम्हाला सकाळी चार वाजता उठायचंय. अभ्यास संपवायचाय. व्यायाम करायचाय. मेडिटेशन करायचंय. तुम्ही ते सोडू शकत नाही. कारण तुम्हाला तुमचं ध्येय माहिती आहे. त्याची दिशा माहिती आहे. त्याच्यासाठीचा मार्ग तुम्ही आखलाय. त्या मार्गातले टप्पे तुम्हाला माहिती आहेत. एक दिवस जर त्यात खंड पडला तर तुम्ही त्या ध्येयपासून दूर जाणार आहे. मग तुम्हाला त्यांना निग्रहानं नाही म्हणायला लागतं. तुम्हाला खूप वाईट वाटतंय. पण तुम्हाला हे माहिती आहे की आज तुम्ही हा त्याग करताय, तो उद्या तुम्हाला कुठं घेऊन जाणार आहे. कारण तुम्हाला एकट्यानंच प्रयत्न करावे लागणार आहेत.
मित्र असो वा कुटुंब, तुम्हाला ध्येयमार्गावरून दूर नेणाऱ्यांपासून तुम्हाला तुमचा बचाव करायचा तर एकटंच राहावं लागणार आहे. स्वत:ला सांगावं लागणार आहे – I am enough.
मार्च ते मे या दरम्यान तुम्ही कोकणात गेलात तर घरोघरी एक खोली तुम्हाला बंद दिसते. त्या बंद खोलीत त्या शेतकरी कुटुंबाचं भविष्य आकाराला येत असतं. उन्हाळ्याचा सीझन असतो आंब्यांचा. कोकणात हापूसच्या बागा आहेत. हे आंबे झाडावर पिकवायचे नसतात. त्यामुळं पाडाचे आंबे काढून त्यांची अढी घालतात. ही अढी म्हणजे एका खोलीत वाळलेलं गवत पसरून त्यावर ते आंबे ठेवायचे आणि पुन्हा गवतानं झाकायचे. ती खोली बंद करतात. त्या आंब्यांना एकटं ठेवतात. कारण ते आंबे पिकायला आले की त्यांना पेटीत बांधून पाठवावे लागतात. त्यांना बाहेरची हवा, पाणी, ऊन काही लागून चालत नाही. त्यांना सुरक्षित वातावरणात पिकवायचे. कारण ते जर चांगले पिकले तर त्यांना दर येतो. म्हणून त्यांना खोलीबंद करतात. तसंच आपल्याला करायचं असतं. एकटं राहून स्वत:ला बंद करून दिवसरात्र मेहनत करून स्वत:ची प्रगती करायची असते. आपलं त्या आंब्यांसारखंच असतं. त्यांच्यावर जसा बाहेरच्या वाईट हवेचा पटकन परिणाम होतो. तसं आपल्यावरसु्दधा बाहेरच्या नकारात्मक विचारांचा परिणाम लगेच होतो. कोणी आपल्या स्वप्नांविषयी शंका घेतली तर आपल्यालाही तसं वाटायला लागतं. कोणी आपल्याला काही आमिष दाखवलं तर आपण कदाचित त्याला बळी पडू शकतो. कदाचित आपण आपल्या ध्येयापासून भरकटू शकतो.
पूर्वीच्या काळी मुलांना गुरूकुलात पाठवायचे. तिथं शिक्षण घ्यावं लागायचं. आईवडिलांपासून लांब. जिथं कुणीच तुमचं नाही. तुम्हीच तुम्हाला सांभाळायचंय आणि शिक्षण घ्यायचंय. बाहेरच्या जगापासून, वाईट विचारांपासून तुम्हाला तुमचा बचावर करायचाय. त्या बंद खोलीतल्या आंब्यांप्रमाणे.
राक्षसांचा राजा रावण नावाच्या कादंबरीतला एक प्रसंग आहे. रावणाचं मूळ नाव दशग्रीव. हा दशग्रीव विश्राव्य ऋषींचा मुलगा. त्यांच्याच आश्रमात लहानाचा मोठा झाला. पुढं पंधरा वर्षांचा असताना त्याचे आजोबा त्याला व त्याच्या भावंडांना घेऊन गेले. दशग्रीवाच्या मनात असंख्य प्रश्न होते. स्वत:च्या जन्माविषयी, वडिलांविषयी, आई आणि मावश्यांविषयी. त्याला त्यांची उत्तरं हळू हळू आजोबांकडून मिळत होती. आजोबा त्याच्या चौकस बुद्धीला वाव देत होते. आजोबांबरोबर राहायची एकही संधी तो सोडत नसे. यातून एक दिवस आजोबांनी सांगितले की ते नर्मदा परिक्रमेला निघणार आहेत. तर त्यांच्याबरोबर जाण्याची कुणाची इच्छा असेल तर ते जाऊ शकतात. दशग्रीवानं विचार केला की हे चांगलं आहे. आजोबांबरोबर दोन महिने एकटाच असेन. त्यामुळं त्यांना हवे ते प्रश्न विचारू शकतो. तो ताबडतोब तयार झाला. परिक्रमा सुरू झाली. दशग्रीवाला वाटत होतं त्याप्रमाणे काहीच घडेना. आजोबा काहीच बोलेनात. तो प्रश्न विचारत होता. पण आजोबा त्याला तोंडानंच गप्प राहायची खूण करायचे. तो नाराज व्हायचा. असेच दोनचार दिवस गेल्यावर त्यानं आजोबांना प्रश्न विचारणं सोडून दिलं. त्यानंतर नर्मदेच्या किनाऱ्यावरील सृष्टीसौंदर्याकडं त्याचं पहिल्यांदाच लक्ष गेलं. तो मंत्रमुग्ध झाला. आजवर जे ज्ञान मिळालं होतं. त्यावर विचार करू लागला. आजूबाजूच्या सृष्टीचा विचार करू लागला. दिवसचे दिवस फक्त स्वत:शीच संवाद होत असल्यामुळं त्याला अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या आपण सापडली.
याच कादंबरीत अजून एक प्रसंग आहे. दशग्रीवाला चुकीच्या कारणासाठी माहिष्मतीच्या राजानं तुरूंगात टाकलं. सुरूवातीला त्याला आशा होती की कुणीतरी सोडवेल. पण कुणीच आलं नाही. हळूहळू त्याला त्या तुरूंगाची सवय झाली. त्याचं चिंतन मनन सुरू झालं. आपल्याला यातून जिवंत बाहेर पडून पृथ्वीवर राज्य करायचंय ही भावना वाढीस लागली. बाहेरच्या विचारांचा काहीच संपर्क आला नाही त्यामुळं त्याचे विचार प्रगल्भ झाले. मनाचा निग्रह वाढला. पुढं जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याला नक्की माहित होतं की तो पृथ्वीवर कशा पद्धतीनं राज्य करणार आहे.
एकटं राहणं ही शिक्षा नाही. संकट नाही. एकटं राहणं ही एक संधी आहे. जी आपणच आपल्याला देतो आणि त्यातून आपला उत्कर्ष साधतो. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे आवश्यक आहे ते सारं काही शिकू शकतो. विचार करा. कोविड लॉकडाऊनच्या काळात कित्येक जण कित्येक नव्या गोष्टी शिकले. कारण डिस्ट्रॅक्शन्स कमी होती. स्वत:वर लक्ष केंद्रित करता येत होतं.
आपण एकटे राहतो. म्हणजेच लोकांसाठी कमी प्रमाणात उपलब्ध होतो. सुरूवातीला लोक चेष्टा करतील. आपल्याला हिणवतील. पण आपण आपल्या निश्चयापासून ढळत नाही हे पाहून यातील काहीजण आपला आदर करायला लागतील. आपल्या निर्णयाचं समर्थन करतील. आपण असेच प्रयत्न करत राहिलो, तर ते आपल्याला कधीच इग्नोर करणार नाहीत. आपण यश मिळवलं तर हेच सगळे जण आपला उदो उदो करणार आहेत.
आज त्रास होईल. त्याग करावेसे वाटतील. पण खरंच तुम्हाला प्रगती करण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही. तुमचे तुम्ही पुरेसे आहेत. You are enough. स्वत:ला बजावत राहायचं की I am enough. आणि आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळ्यांवर कशी मात करता येईल यावर काम करत राहायचं. हळूहळू आपण नक्की त्यात यशस्वी होतो.
मग हे यश मिळाल्यानंतर तुम्हाला कधीच कुणाच्या मदतीची, दयेची गरज पडणार नाही. लोक आपणहून तुम्हाला मदत करायला पुढे धावतील आणि तेव्हा तुम्ही अभिमानाने त्यांना सांगून शकाल – I am enough.



Comments