top of page
Search

मन का भरकटते? मनाला स्थिर कसं करायचं?

 

माझ्या लहानपणी आमच्या घरी जेव्हा पहिल्यांदा टीव्ही आला तेव्हा त्याला फक्त एकच चॅनेल होता. दूरदर्शन. तेव्हा डीडी वगैरे असं काही नव्हतं. दूरदर्शन. तेही दिल्ली दूरदर्शन. त्यातसुद्धा फक्त आठनंतर तिथे काहीतरी बघायला असायचं. म्हणजे लहान मुलांसाठी. बाकी मग काय – कृषि दर्शन, पोलिओ मिशन.. असलं काहीबाही चालू असायचं. त्यामुळं जेव्हा टीव्ही पाहायला बसायचो तेव्हा टीव्हीवर जे काही चालू असेल ते गपगुमान पाहायचं. काहीही इकडचं तिकडचं नाही. जास्तीत जास्त आवाज लहान कर, मोठा कर एवढंच. टीव्हीला रिमोट कंट्रोलपण नव्हता आमच्या. आता मी टीव्ही बघतो... बघतो म्हणजे फक्त या चॅनलवरून त्या चॅनलवर उड्या मारतो. नेमकं काय बघतो देव जाणे. अगदी क्रिकेट मॅच सुरू असतानासुद्धा दोन ओव्हरच्या मध्ये दुसरा चॅनल लावायचा. का? देव जाणे.. आहे ना उपलब्ध. मग बदला चॅनल. अरे, लहानपणी बघितलेल्या सीरीज आजपण आठवतात. त्याचं कारण म्हणजे केवळ त्या चांगल्या होत्या असं नाही तर त्यांची कमतरता होती आणि आपण त्या जास्त फोकस ठेवून बघायचो. कारण सर्फ करून दुसरं काही बघण्यासारखंच नसायचं. पण आता खूप पर्याय आहेत. पण ते आहेत म्हणून एकाच वेळी पाहायलाच हवेत का?

आणि दुर्दैवानं हे सगळं विविध वयोगटातल्या लोकांबरोबर होतं. माझ्या घरात तीन पिढ्या आहेत. तिन्ही पिढ्या कमी अधिक प्रमाणात हेच करतात. टीव्ही चालू आहे. तरी मोबाईलवर काहीतरी बघायचं. इकडंही लक्ष नाही आणि तिकडंही नाही.

हीच चंचलता आहे ना ती सगळ्या गोष्टीत दिसते. फोनवरसुद्धा इन्स्टाग्रामवर काहीतरी पाहायचं. मग फेसबुकवर, मग युट्युबवर, कधी काहीतरी ब्लॉग वाचायचा. मग व्हॉट्सॲपवर चॅट करत बसायचं... थोडक्यात काय तर एका जागी स्थिर राहायचं नाही. कारण काय तर आपलं मन भरकटत राहतं. एका जागेवर स्थिर बसायची वृत्ती कमी होत चालली आहे. हे केवळ टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यापुरतं मर्यादित नाही. जवळपास प्रत्येक वेळी आपण पाहतो की आपला फोकस होत नाही. आपलं मन त्या गोष्टीवर केंद्रित नसतं. आपण बोली भाषेत म्हणतो की माझं मन नाहीए. मन नाहीए म्हणजे जी गोष्ट करतोय त्यात माझं लक्ष नाही. माझा फोकस होत नाहीए. फोकस होत नाही तेव्हा जे काम करतो ते काम पूर्ण होत नाही. एक काम करता करता दुसरं काम सुचतं आणि दुसरं काम करताना तिसरं. मग लक्षात येतं की जे काम पहिल्यांदा करायला घेतलं होतं ते तर विसरलंच. मग गिल्ट यायला सुरूवात होते. अपराधी वाटायला लागतं की ते काम पूर्ण केलं नाही. आणि मग असं करत आपण योजलेलं कुठलंच काम पूर्ण होत नाही. आपली आई किंवा पत्नी स्वयंपाक करते किंवा अगदी साधा चहा करते त्यावेळेस त्यांचं लक्ष भलतीकडंच गेलं आणि भाजीला मीठ कमी पडलं किंवा चहात चहा पावडरच्या बरोबरीनं मीठही घातलं तर? मग त्यांचं कसं लक्ष केंद्रित होतं?



मन भरकटतं हे खरं. त्यावर उपाय काय? हे कमी कसं करायचं? मनाला एका जागी बांधून कसं घालायचं?

आपल्या बहिणाबाईंनी मनाचं फार सुंदर वर्णन केलं आहे –

मन पांखरू पांखरू,

त्याची काय सांगू मात?

आता व्हतं भुईवर,

गेलं गेलं आभायांत

मनाची बातच वेगळी असते. पाखरासारखं मन कधी जमिनीवर असतं असं वाटतं तर क्षणात आभाळात उडू लागतं.

त्याच कवितेच्या शेवटच्या ओळीत बहिणाबाई चक्क देवालाच प्रश्न विचारतात – देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं? कुठे जागेपनी तुला, आसं सपान पडलं?

आता काय सांगायचं? देवाला तरी कळलं असेल का की मन असं का असावं.

मग आपल्याला कसं कळायचं? पण तरीही आपण आपल्यापुरते उपाय केले तर फायदा आपल्यालाच आहे. पण त्यासाठी आधी मन अस्थिर व्हायची, भरकटायची कारणं शोधायला हवीत.

१.     आपण जी गोष्ट पाहात किंवा करत असतो त्यात आपल्याला रस वाटत नाही. मग ती गोष्ट कंटाळवाणी वाटायला लागते. त्या कामात लक्ष लागत नाही. मग त्यापेक्षा दुसरं काहीतरी करून पाहावं असं वाटतं आणि आपण ते काम सोडून दुसरं काम हातात घेतो.

अशावेळी आपल्याला विचार करायला हवा की आपल्याला हे काम जर आवडत नसेल तर मग दुसरं कुठलं आवडतंय. मग आवडणाऱ्या कामासाठीचं कौशल्य आपल्याकडं आहे का? हे काम सोडून ते काम करणार असू तर आर्थिक गणितं किती बिघडणार आहे. आपल्या घरच्यांना आपला काम बदलण्याचा निर्णय कळवला तर काय काय गडबड होऊ शकते. ते हा निर्णय कशाप्रकारे स्वीकारणार आहेत. या सगळ्याचा विचार करायचा आणि मग आवडत्या गोष्टीचं पुरेसं प्रशिक्षण घेऊन आपण ती गोष्ट करायला सुरूवात करू शकतो. माझ्या पाहण्यात असे खूप इंजिनिअर्स आहेत जे फोटोग्राफी करतात, म्युझिकचं काम करतात, यूट्युबर्स आहेत, हॉटेल्स काढलीत किंवा शेअर ट्रेडिंगचं काम करतात. त्यांना इंजिनिअरींग आवडत नव्हतं. संधी मिळाली तशी त्यांनी आपलं आवडीचं क्षेत्र निवडलं आणि आता ते त्यात मन लावून काम करतात.

२.     कधीकधी थकवा आल्यामुळं आपलं लक्ष लागत नाही. आदले काही दिवस खूप ताण आला असेल किंवा शरीर थकलं असेल तर त्यामुळंही आपलं कामात लक्ष लागत नाही.

अशावेळी शक्य असेल तर सरळ काम बंद करावं. सर्वांत चांगलं म्हणजे एक छानशी झोप घ्यायची. मग फ्रेश होऊन कामाला पुन्हा सुरूवात करायची. असं केल्यामुळं आपण दुप्पट जोमानं काम करतो. पॉवर नॅप खरंच परिणामकारक असतात. पण हे ऑफिसमध्ये शक्य होत नाही. मग अशावेळी एखादा छोटा ब्रेक घ्यावा. पाच-दहा मिनिटांचा वेळ तर मिळतो. यूट्युबवर एखादं रिलॅक्सिंग म्युझिक लावायचं. हेडफोन कानात घालून निवांत बसायचं. चहा-कॉफी आवडत असेल तर ती घ्यायची. किंवा मग नुसतं डोळे मिटून बसायचं. किंवा थोडं चालून यायचं. भविष्याची स्वप्नं पाहात राहणं. आपल्याला एकतर भूतकाळात रमायला आवडतं नाहीतर भविष्यात. कारण तिथं रम्य गोष्टी असतात. आपल्या लहानपणीच्या आठवणी किंवा आपण भविष्यात जगणार असलेलं आयुष्य या गोष्टींमुळं आपण तिथं रमतो. मग वर्तमानातलं लक्ष कमी होतं.

३.     एकाच वेळी खूप काम म्हणजे मल्टिटास्किंग करायची आपल्याला सवय असते. आणि ती सवय मन भरकटवायला कारणीभूत ठरते. हे पण करायचंय, तेपण करायचंय. मग एक ना धड भाराभार चिंध्या.

पण असं असलं तरी काही वेळा अशा येतात की मल्टि-टास्किंगशिवाय पर्यायही नसतो. एकावेळी अनेक कामं करावी लागतात कारण डेडलाइन्स असतात आणि त्या त्या मुदतीत ते ते काम संपवावं लागतं. मग अशावेळी त्या कामांची प्रायोरिटी ठरवायची. कुठलं काम आधी करायचं, कुठलं नंतर हे फिक्स करायचं. जी कामं दुसऱ्या कुणाकडून करून घेऊ शकतो, ती त्यांना करायला द्यायची आणि आपण आपल्यापुरती कामं ठेवायची. यातून प्रत्येकाची वर्क एफिशियंसी वाढते आणि कामही चांगलं होतं.

४.     कामातला एकसुरीपणाही कामातलं लक्ष कमी करायला कारणीभूत ठरतो. एकच्या एक काम करून फार कंटाळा येतो. खासकरून त्या कामात काहीच नाविन्य नसतं त्या कामात फार कंटाळा येतो. मी शूटिंगसाठी जेव्हा फॅक्टरीजमध्ये जातो, तेव्हा असेम्ब्ली लाईनवर काम करणाऱ्या लोकांविषयी मला विशेष आदर आहे. कारण ही मंडळी रोज तेच काम करतात. त्या त्या मशिनमधला तेवढाच पार्ट त्यांनी लावायचा असतो. पुढच्या पार्टशी यांचा संबंध नाही. आधीच्या पार्टशी नाही. आपल्या डोळ्यासमोर येईल तेच काम. हातांना तीच सवय. मला नेहमी वाटतं की कंटाळा येत नसेल यांना? मी नेहमी या लोकांशी बोलतो. त्यांना विचारतो की तुम्हाला कंटाळा येत नाही का? ते म्हणतात की मग खायचं काय? त्यांच्या आयुष्याचा पर्पज किंवा उद्देश त्यांच्याकडून हे काम करवून घेतो. तो उद्देश त्यांच्या कंटाळ्यापेक्षा खूप मोठा असतो. तो त्यांच्याकडून हे काम करवून घेतो. त्यामुळं काम एकसुरू वाटायला लागलं तर हे काम आपण का करतोय हे लक्षात आणायचं. आपोआप ते काम आपण व्यवस्थित करतो. शिवाय शक्य असलं तर त्यात छोटे छोटे ब्रेक्स घेता आले तर उत्तम. तेवढ्या वेळात एखादं गाणं ऐकलं, एखादा जोक वाचला किंवा मित्रांशी गप्पा मारल्या तर फ्रेश व्हायला होतं.

५.     काही वेळेला काम करता करता काहीतरी विनाकारण डिस्टर्बन्स येतो. म्हणजे अभ्यासाला आणि कुणीतरी मोठ्यानं टीव्ही लावलाय. किंवा त्याही पुढचं. की आता काहीतरी काम आहे आणि नेमकी वर्ल्डकपची फायनल मॅच आहे. हे करू की ते करू? काम करायला घेतलं तर लक्ष मॅचमध्ये. मग काय करायचं? कामावर कसा फोकस करायचा?

मोठ्यानं टीव्ही लावला तर आपल्याला फक्त आवाज ऐकू येतो. कानात चक्क कापसाचे बोळे घालायचे आणि काम करायचं. मी तर कित्येक वेळा नुसतेच इअरफोन कानात खुपसून काम करतो. कारण मला बाहेरचे कुठलेच आवाज ऐकायचे नसतात. त्यामुळं मला डिस्टर्ब होतं. सेम करून पाहा. कामात लक्ष लागेल.

पण एकावेळी दोन गोष्टी क्लॅश होतायत तर मग एक गंमतीशीर टिप सांगतो. प्रोक्रास्टिनेशन लक्षात आहे ना? एक व्हिडीओ केला होता त्यावर. जमलं तर बघून घ्या. आता हा निगेटिव्ह शब्द आहे. प्रोक्रास्टिनेशन चा अर्थ कामाची चालढकल. काम पुढं ढकलायचं. तर एक्झॅक्टली हीच गोष्ट करायची. दोनपैकी एका कामाला चक्क पुढं ढकलायचं. मॅच लाईव्ह असते. ती तशीच पाहण्यात मजा आहे. मग जे काम करायचंय ते पुढं ढकललं तर चालणार आहे का? ते जर शक्य असेल तर मग मॅच एंजॉय करा. पण नंतर मात्र ते राहिलेलं काम पूर्ण करायची जबाबदारी आपली.


याशिवाय एकाग्रता वाढवण्यासाठी खूप काही करू शकतो.

-    त्यात मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याची ॲप्सही असतात. तंत्रज्ञानाचा वापर करून मेडिटेट करून फोकस मिळवू शकतो.

-    मनाला भरकटून देऊन पुन्हा जाग्यावर आणायचा व्यायाम करायचा. एका कुठल्या तरी गोष्टीवर मन केंद्रित करायचं. तो विचार करता करता भलताच विचार करायचा आणि पुन्हा पहिल्या गोष्टीवर मन केंद्रित करायचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट आता अवघड वाटते. पण प्रयत्नपूर्वक केलं तर नक्की जमू शकते.

-    कामाचं व्यवस्थित नियोजन करून काटेकोर पालन करायचं. त्यावेळी त्याच कामात लक्ष हवं. जेवत असलो तर जेवायचं. वाचत असलो तर वाचायचं. टीव्ही पाहायच्या वेळी टीव्हीच पाहायचा आणि व्यायामाच्या वेळी व्यायामच करायचा. यांना मिक्स केलं तर गडबड उडते. त्यासाठी मनाला ट्रेनिंग द्यायचं.

-    कामाच्या ठिकाणचं वातावरण प्रसन्न असावं याकडं लक्ष द्यायचं.

-    आपल्या व्यक्तिगत आघाडीवर समस्या असतील तर कामातून ब्रेक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. मग कामावर एकमार्गी लक्ष देता येईल.

अशा खूप गोष्टी आहेत, या भरकटलेल्या मनाला जागेवर आणतील. नुसतं वाचू नका. सुरू करा.

 

 
 
 

Comments


bottom of page