top of page
Search

नाही म्हणणं इतकं अवघड का आहे?

 

नाही न म्हणता आल्यामुळं माझ्या जवळची एक व्यक्ती आता कोर्टाच्या फेऱ्या मारते आहे. नकार न देता आल्यामुळं माझ्या मित्राच्या मित्राला चुकीच्या व्यक्तीशी लग्न करावं लागलं. आयुष्यभर त्रासात राहावं लागलं. नाही न म्हणता आल्यामुळं मला स्वत:ला कमी पैशात काम करावं लागलं आणि अडकलेले पैसे वसूल करायला सात वर्षं लागली आहेत.

केवळ आपण नाही म्हणू शकत नाही म्हणून आपल्या आयुष्यातली अनेक दु:खं आपण ओढवून घेतली आहेत. पण अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी मला ही गोष्ट लक्षात आली की आपण योग्य पद्धतीनं नकार देऊ शकतो. हे करायचं कसं?

 



एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नकार देता न येणारे तुम्ही एकटेच नाही आहात. जगातली प्रत्येक व्यक्ती या अवस्थेतून गेलेली असते. प्रत्येकाला याचे दुष्परिणाम भोगायला लागलेले आहेत. कुणाला थोड्या काळासाठी तर कुणाला दीर्घकाळासाठी. आपण नकार का देऊ शकत नाही?

कुणी काम सांगितलं तर आपण ताबडतोब तयार होतो. कुणी कुठे बोलावलं तर आपण लगेच जातो. कुणी पैसे मागितले तर आपण लगेच देतो. एखाद्याला मदत करण्याची वृत्ती ही चांगलीच आहे. ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना मदत केली तर आत्मिक समाधान मिळते आणि आध्यात्मिक पुण्यही मिळते. पण तरीही नकार न देता येण्याची खंत आपल्या मनात राहतेच. ती का?

ही सवय घालवता येईल का? कशी?


तर सगळ्यात आधी बघू या की ही सवय लागते कशी.

o   अनावश्यक गोष्टींना हो म्हणतो

नेहमी हो म्हणण्याच्या नादात आपण बऱ्याचदा अशा गोष्टींना होकार देऊन बसतो, ज्या गोष्टी पूर्णपणे अनावश्यक आहेत. त्या गोष्टींमुळं कुणाचंच काही भलं होणार नाही. ना त्या विचारणाऱ्यांचं ना आपलं. उदा. चहा प्यायला जायचं का आता? हा प्रश्न आल्यावर आपण सहसा नाही म्हणत नाही. कारण आपण विचार करतो की त्यात काय एवढं? चहा मला कधीही चालतो आणि समोरचा विचारतोय तर जाऊन येऊ. त्या व्यक्तीचा विचार कराल तर ती व्यक्ती आपलं काम संपवून आलेली असते आणि आपण मात्र आपलं काम सोडलेलं असतं. पण त्यासाठी आपण जेव्हा जातो, तेव्हा आपण हातातलं काम सोडतो. जाऊन येऊन अर्धा तास वाया घालवतो. मग गेलेला वेळ आपल्यालाच भरून काढायला लागतो. या अनावश्यक गोष्टींना हो म्हणण्यापूर्वी विचार करायला हवा की हे करणं खरंच गरजेचं आहे का?

o   आपल्याला भीती वाटत असते

आपला स्वभाव असतो की आपल्याला स्वत:ला नकाराची भीती वाटते. त्यामुळंच इतरांना नकार देतानाही आपल्याला भीती वाटत असते. हे नकार न देण्याचं मुख्य कारण असतं. आणि ही भीती कुठल्या कुठल्या प्रकारची असते?

  • इतरांना दुखावण्याची भीती

आपल्याला वाटत असतं की आपण त्यांना नकार दिला तर ते दुखावले जातील. आपल्याविषयी ते काय विचार करतील जर आपण नकार दिला तर? आपण हा विचारच करत नाही की आपण होकार दिला तर आपलं काय होईल? जे काम आपण सहज करू शकतोय ते कदाचित या होकारामुळं लांबेल किंवा होणारच नाही. मग नुकसान आपलंच होणार. आपण तो विचार न करता त्यांना काय वाटतंय याचा विचार करतो आणि होकार देऊन बसतो.

  • चुकीचे निर्णय घेण्याची भीती

बऱ्याचदा एखाद्या विशिष्ट परिस्थितीत एखाद्या संधीला आपण नकार देऊ शकत नाही. आपण घाबरत असतो की जर आपण ही संधी नाकारली तर मग पुढं जाऊन आपल्याला पश्चात्ताप करावा लागेल. हा निर्णय चुकू शकतो. कदाचित हीच ती संधी असेल. आपल्याला मनातून वाटतही असतं की ही संधी आपल्यासाठी सर्वोत्तम नाही. पण तरीही नकार देता न येण्याची सवय आपल्याला निर्णय घेताना नडते.

  • झुंडीबरोबर जाण्याची सवय

आपण निर्णय घेऊ शकत नसतो कारण आपल्याला आपल्यासाठी योग-अयोग्य असं काही कळत नाही. आपल्याला वाटतं की मोठा समूह जिकडे जातोय, तिकडे जावं. एवढ्या लोकांचं एकावेळी चुकणार नाही. त्यांचं जे होईल तेच आपलं होईल. त्यामुळं आपण नकार देऊ शकत नाही. आठवतंय ना, गेल्या पंधरा-वीस वर्षांत कित्येक लोक इच्छा नसताना इंजिनिअर झालेत? त्याचंही कारण हेच आहे.

  • मागे पडण्याची भीती

आपण इतरांपेक्षा मागं पडू या भीतीतून अनेक निर्णय घेताना आपण कच खातो. आपल्याला पटत नसतानाही आपण होकार देऊन रिकामे होतो. याला FOMO – Fear Of Missing Out म्हणतात. आपल्याला वाटतं की आपण जर नकार दिला तर आपल्याला ती गोष्ट मिळणारच नाही, जी आपल्याला होकार दिल्यावर कदाचित मिळू शकते.

 

यावर उपाय काय?

कारणं काहीही असोत. आपण नकार द्यायला घाबरतो आणि त्यामुळंच मोठ्या प्रमाणावर नुकसान करून घेतो. पण हे सगळं मान्य आहे. हा सापळा भेदायचा कसा? यातून बाहेर पडून नकार द्यायला शिकायचं कसं? हे करणं गरजेचं आहे, हे जर तुम्हाला पटत असेल तर मग तुम्ही पहिली पायरी गाठली आहे.

म्हणूनच मग खालील उपाय करायला सुरू करायचे.

आपल्यासाठी आवश्यक काय आहे?

आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला होकार देतो किंवा आपण तो निर्णय घेणार असतो, तेव्हा आपण आपल्याला विचारायला हवं की ज्यासाठी आपण होकार देणार आहे ती गोष्ट कितपत आवश्यक आहे. या गोष्टी का आवश्यक आहेत? हे केलं नाही तर काय नुकसान होणार आहे? मला यासाठी नेमकं हो किंवा नाही का म्हणायचं? ही गोष्ट करून काय होणार आहे आणि केली नाही तर काय होणार आहे? याचा खरंच उपयोग होणार आहे का? ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे का? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असतील तर मग ती गोष्ट न केलेली चांगली.

स्वयंशिस्त

नकार देण्याची सवय लावून घेण्यासाठी स्वयंशिस्त खूप गरजेची असते. उदा. आपल्याला कुणीतरी रात्री पार्टीसाठी बोलावतंय आणि आपल्याला पहाटे उठून जिमला जायचंय. तर आपलं आपल्याला कळायला हवं की जिम महत्त्वाची आहे की पार्टी. याच आवश्यक गोष्टी करायला अवघड असतात. मनातून आपल्यालाही त्या आवश्यक गोष्टी सोडून मजा करायला कुणी बोलावलं तर आपण जातो. अशावेळी स्वयंशिस्त गरजेची असते. ज्या व्यक्तीला नकार देतोय, त्यांना नकारामागचं कारण सांगायचीही गरज नाही. कारण आपल्याला या गोष्टीचं महत्त्व आहे, तेव्हढं त्यांना असेलच असं नाही. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण एकट्यानं एखादी गोष्ट करूच शकणार नाही. मग समोरचा आपणहून विचारतोय तर हो म्हणून टाकूया. इथं स्वयंशिस्त गरजेची

आपल्याकडं असलेल्या वेळेची किंमत करणे

रोज रात्री बारा वाजता आपल्याला चोवीस तासांचा रिचार्ज पॅक मिळतो. या पॅकमधलं एक एक मिनिट अत्यंत मह्त्त्वाचं आहे. आपली रोजची आवश्यक कामं करून आपल्याला स्वयं विकासासाठी जेमतेम पाच ते सहा तास मिळतात. त्यातही आपण तो वेळ इतर कुणासाठी खर्च करायचा हे जास्तच होतं. आपण एखाद्या गोष्टीला होकार देताना जो वेळ जातो तो खरंच गरजेचा आहे का याचा विचार करावा. आवश्यक असलं तर हो म्हणावं. त्या वेळातून आपल्याला काय मिळणार आहे? हा स्वार्थी विचार नाही. कधीकधी स्वत:चा विचार करणं गरजेचं असतं. कारण, आपल्या वेळेची आपणच कदर करायची आहे त्यामुळं नकार द्यायला लागला तर द्यायचा. यासाठी योग्य शब्दांत नकार द्यायचा.

खरंच होकार देणार देणं गरजेचं आहे का?

कधीकधी गोष्टींना पर्याय असतात. एखादी गोष्ट उद्यावर टाकून चालणार असते. त्याक्षणी जर तुमचं काम जास्त महत्त्वाचं असेल तर त्याला प्राधान्य द्यायला हवं. आयुष्यात करण्यासाठी कमी गोष्टी असल्या तर हातातल्या गोष्टींना जास्त वेळ देता येतो. त्यामुळं आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा. नम्रपणे पण स्पष्टपणे नकार द्यायला हवा. मी नाही केलं तर चालेल का? या पद्धतीची भाषा हवी. त्यामुळं समोरच्यालाही आपल्या वेळेचं आणि आपण करत असलेल्या कामाचं महत्त्व कळतं आणि तो आपल्याला विनाकारण आग्रह करत नाही.

 

या गोष्टी करून पाहा. छोट्या छोट्या व्यसनांना, प्रलोभनांना नकार द्यायची सवय करा. यातून मोठ्या गोष्टींनाही नकार द्यायची सवय लागेल. आपल्या प्राधान्याच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. मुख्य म्हणजे समाधानानं, आनंदानं जगणं सोपं होईल.

 
 
 

Comments


bottom of page