तुम्हाला गृहित धरणाऱ्या लोकांना कसं उत्तर द्याल?
- Amol Bakshi
- Apr 16, 2024
- 5 min read
आपल्याला गृहित धरलं जातं तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. मी इतकं करतो किंवा करते तरीसुद्धा मला गृहित धरतात. कुणाला माझी किंमत नाही. मला कुणी विचारत नाही. माझं मत विचारात घेतलं जात नाही. साधं काय हवं नको ते सुद्धा विचारत नाही. असं होतं का तुमच्या बाबतीत? असं वाटतं का तुम्हाला? मग त्याचं काय करायचं? अशा गृहित धरणाऱ्या लोकांना काय उत्तर द्यायचं? गृहित धरल्यावर आपण कसं वागायचं?
मला एक सांगा तुम्हाला तुमची शाळा आठवते का? तुमचे मित्रमैत्रिणी, शिक्षक? शाळेतल्या गप्पा, दंगा मस्ती, एखादे मारकुटे सर, एखादे धमाल करणारे सर, एक शब्द शंभर वेळा लिहायला लावणाऱ्या मॅडम? आठवतात? किती आठवतात? मला वाटतं की आपल्याला या गोष्टी सगळ्यात जास्त आठवतात. बालपणीचा काळ सुखाचा. या गोष्टी का आठवतात? बरं अजून एक गोष्ट..
आपल्या लहानपणी आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारं कोण आहे असं वाटायचं? आपली आई आपल्याला ओरडायची, कधी फटके पण द्यायची, कारल्याची भाजी करायची, मुळ्याची कोशिंबीर खाऊ घालायची आणि वडिलांचं तर काय सांगायचं? त्यांना बघितलं की भीतीच वाटायची. हे आपल्याला धुणार किंवा काहीतरी शिक्षा करणार. मग कोण उरलं? तर आपली आजी. आजी फार प्रेमळ वाटायची. आजी हळूच खाऊ द्यायची. कारल्याची नाहीतर शेपूची भाजी खायला लागल्यावर मग तिच्याजवळचं खारीक नाहीतर बेदाणे द्यायची. कधी गोळ्याचॉकलेटसाठी पैसे द्यायची. आणि आजीच्या गोष्टी.. त्या तर इतक्या धमाल. तिला गोष्ट सांगता येऊ दे नाही तर नाही येऊ दे.. पण तिच्याकडचे किस्से अफाट असायचे. आपण प्रत्येकानं लहानपणी आजीआजोबा किंवा दोघांपैकी एकाकडून असं प्रेम अनुभवलेलं असतं आणि आपल्याला त्यांची आता खूप आठवण येत असते.
किंवा थोडं मोठं झाल्यावर आपण घर सोडून शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर पडतो. मग आपल्याला आपली आई आठवते. मेसचं जेवण जेवायला लागल्यावर कारल्याची भाजी दिली तरी चालेल. पण आईच्या हातचं खायचं असतं. बाहेरचा एखादा रागावून बोलला की मग आपले वडिल आठवतात. की माझ्या बाबांसमोर असं कुणी मला बोललं असतं तर त्यांनी त्याला उभा सोलला असता.

पण हे सगळं आता सांगायचं कारण काय? आपण तर गृहित धरायचा व्हिडीओ बघायला घेतला होता ना?
तर मला तुम्हाला विचारायचंय की तीस सेकंदासाठी विचार करा.. हे जे आपण आजी, आई, बाबा किंवा लहानपणीचे दिवस यांची आठवण आली की हळवे होतो त्याचं कारण काय आहे. त्याचं कारण हे आहे की त्या गोष्टी त्या व्यक्ती आता नसतात. आणि मग त्यांची आठवण येते. आपल्याला त्यांची किंमत आता कळते जेव्हा ते नाहीयेत. पण तेव्हा मात्र कळलेली नसते. का? कारण आपल्याला वाटत असतं की ही लोकं नेहमी आपल्यासाठी आहेतच. आपण कितीही उशीरा घरी आलो तरी रात्री जेवण गरम करून द्यायला आपली आई असणारच आहे. आणि ती जेव्हा नसते, तेव्हा तिची किंमत कळते. आपल्याला तेव्हा लक्षात येतं की आपण इतकी वर्ष तिला गृहित धरलेलं होतं.
आता गृहित धरणं म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. मग आपण ज्या पद्धतीनं या लोकांना गृहित धरलेलं असतं तसंच आपल्याही बाबतीत होतं तर आपल्याला अतिशय दु:ख होतं. धक्का बसतो.
एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीत असंच वागेल किंवा वागणार नाही याविषयी त्या त्या वेळी त्या व्यक्तीचं मत विचारात न घेता आपल्या समजुतीनं चालणं म्हणजे त्या व्यक्तीला गृहित धरणं.
मग लोकं आपल्याला गृहित का धरतात?
अतिपरिचयात अवज्ञा नको
पूर्वी असं म्हणायचे मलय पर्वताच्या आसपास राहणारे लोक सरपण म्हणून डोंगरावरच्या झाडांची लाकडं तोडून आणायचे. त्या लाकडांना अतिशय सुंदर सुगंध यायचा. त्यांना त्या लाकडांची काहीच किंमत नव्हती. पण आख्ख्या जगाला त्या लाकडानं भुरळ घातलेली होती. एक प्रवासी तिथं आला. त्यानं पाहिलं की ही माणसं चुलीतलं सरपण म्हणून ही लाकडं आणताहेत. तेव्हा त्याला धक्का बसला. तो गावच्या प्रमुखाला म्हणाला की तुम्ही ही लाकडं वापरता? तो म्हणाला हो, ही झाडं इथं मुबलक आहेत. म्हणून आम्ही हीच लाकडं वापरतो. ती लाकडं होती चंदनाची. ती तिथं मुबलक प्रमाणात होती. यालाच म्हणायचं अतिपरिचयात अवज्ञा. जी गोष्ट ज्या ठिकाणी दुर्मिळ असते, तिथं तिचं कौतुक फार असतं. अति झालं की त्याला काही अर्थ नसतो. आपले शिक्षक जर रोज मारत असतील तर मुलंपण कोडगी बनतात. त्यामुळं अशावेळी गृहित धरलं जातं. की आपण इतरांसाठी सतत उपलब्ध आहोत. त्यांना गरज असो वा नसो. आपण आहोतच. त्यांना गरज असते तेव्हा ते बोलणार. गरज नसली तर आपली अडचण होणार. आणि म्हणून आपण लांब जावं तर मग ते म्हणणार तू इथं कसाकाय नव्हतास? मला गरज होती ना? कारण आपलं सतत असणं त्यांनी गृहित धरलेलं असतं.
दुर्मिळ व्हा
सतत उपलब्ध राहू नका. नातं कोणतंही असो. त्यात स्मार्टपणे वागायला हवं. आपली किंमत ठेवली जायला हवी. समोरच्या व्यक्तीला हे जाणवायला हवं की ही व्यक्ती इथं आहे म्हणजे माझ्यावर उपकार आहेत. ती नसेल तर माझं आयुष्य व्यर्थ आहे. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला हवी.
नकाराची सवय नसणे-
काही व्यक्ती अशा असतात की शक्यतो नाही म्हणत नाही. त्यांना नाही म्हणणं जमत नाही. ते पटकन हो म्हणून टाकतात. त्या व्यक्तीला मदत करतात. जर व्यक्ती चांगली असली तर ठीक आहे. पण नाहीतर ते काय करतात? ते काम झालं की आपल्याला विसरून जातात. कारण आपण मदत करणारच हे त्यांनी गृहित धरलेलं असतं. मग जेव्हा ते आपल्याला साधं थँक्यू ही म्हणत नाहीत तेव्हा आपल्यालाही वाईट वाटतं. नकार द्यायला शिकलं पाहिजे. नकार देताना कारण सांगून नकार देऊ नका. नाहीतर ते त्या कारणावर उत्तर सांगतील. उदाहरणार्थ मला तुझ्याबरोबर यायला जमणार नाही कारण मला घरात काम आहे. मग ते म्हणतील ठीक आहे. काम करून घे. मग जाऊ या. किंवा आल्यावर कर. मग जाऊ या. तुम्ही त्यांच्याबरोबर बाहेर येणार आहे, हे त्यांनी गृहितच धरलेलं असतं. त्यांना ठामपणे सांगा की आज तुम्ही बाहेर जाणार नाही आहे. जमणार नाही म्हटलं की मग शक्यता येते. शक्यतेला वावच ठेवायचा नाही.
मर्यादांची जाणीव नसणे –
बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला हे माहितच नसतं की किती मर्यादेपर्यंत समोरच्या व्यक्तीनं आपल्याला गृहित धरावं. नातंच असं असतं की काही प्रमाणात गृहित धरलं जाणं ओकेही असतं. आपल्यालाही त्यात काही वाटत नाही. कारण आपणही त्या व्यक्तीला काही प्रमाणात का होईना गृहित धरतच असतो. पण काहीजण मात्र इतकं अति करतात की त्रास व्हायला लागतो. यामुळं किती प्रमाणात गृहित धरलं जावं याची मर्यादा आपल्याला माहित हवी. ती मर्यादा ओलांडायचा प्रयत्न झाला तर मग तशी स्पष्टपणे जाणीव करून द्यायची.
नातं टिकवायसाठी गृहित धरणं आवश्यकच असेल तर? असंही घडू शकतं. कारण इगोपेक्षा नातं महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण थोडंफार गृहित धरू देतो. मग नातं टिकायला, सुदृढ व्हायला मदत होते. पण काहीवेळा असं घडतं की त्या व्यक्तीचा इगोच सुखावला जातो. मग ती व्यक्ती प्रत्येकवेळी तुमच्याकडनं तशीच अपेक्षा ठेवू लागते आणि मग गडबड सुरू होते. सगळा अपेक्षांचा खेळ आहे.
आता थोडं अधिक खोलवर जाऊन विचार केला तर? गृहित धरलं जातं तेव्हा इतकं वाईट का वाटतं? कारण आपण अपेक्षा ठेवलेल्या असतात. आपल्याला वाटत असतं की मी इतकं करतोय किंवा करतेय तर त्यांनी माझ्यासाठी थोडं तरी करावं. यातून सोडवणूक करण्यासाठी अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर फारच उत्तम. करायचं तेवढं करायचं आणि नेकी कर दरिया में डाल म्हणत शांत राहायचं. माझी आजी करायची तसं. शेवटपर्यंत बीपी किंवा शुगर काही नव्हतं तिला. मी अजूनही चाचपडतोच आहे. पण ती अवस्था गाठायची आहे.
मला माहिती आहे की अपेक्षा करणं बंद करणं शंभर टक्के शक्य नसतं. पण एक सांगतो की आपण एखादी गोष्ट ठामपणे करतो, तेव्हा आपल्याला एकप्रकारची शक्ती तयार होते. ठामपणानं वागण्याची शक्ती आणि मग आपल्यालावर कशाचाच परिणाम होत नाही.
तरीही गृहित धरलं जात असेल आणि याचा त्रास होत असेल तर आधी सांगितलेल्या गोष्टी करायच्याच शिवाय, मला वाटतं की आपण परक्या माणसाकडून तर गृहित धरलं जात नाही. आपल्यांकडूनच गृहित धरलं जातो. मग अशावेळी आपल्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज आपल्याला नातं सुरू झाल्यावर पहिल्याच महिन्यात येतो. कुणाला किती इगो आहे. गृहित धरलं जाण्याचा धोका किती आहे. हे आपल्याला इथं कळतं. मग त्याचवेळी योग्य शब्दांचा वापर करून संवाद साधून त्या व्यक्तीला या गोष्टींची जाणीव करून देणं गरजेचं आहे.



Comments