आयुष्य बदलणारे १० मार्ग
- Amol Bakshi
- Apr 16, 2024
- 4 min read
कित्येक जण आपल्या आयुष्यात सुखी नसतात. समाधानी नसतात. त्यांना नेहमी वाटत राहतं की जे आयुष्य मिळालं आहे, त्यापेक्षा निराळं काहीतरी मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. ते सतत त्या नव्याच्या शोधात राहतात. पळत राहतात. पण नवं काही गवसत नाही आणि ते कुढत राहतात.
हे सर्व का करायचं? हे बदल का करायचे? कारण आयुष्य समृद्ध करायचंय. आयुष्यात आनंद हवा आहे. त्या आनंदाच्या आड येणाऱ्या अनेक सवयी आहेत, ज्या आपणच आपल्याला लावून घेतलेल्या आहेत. त्या सवयी किंवा स्वभाव हे बदलायला हवं. यातून बाहेर पडायचं तर प्रयत्न हवेतच हवेत. पण सर्वांत आधी हवी इच्छाशक्ती. यापलिकडं काहीच नाही. म्हणूनच मग आयुष्य बदलण्याच्या दृष्टीनं विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्या जीवनात काही छोटेमोठे बदल केले तर हे साध्य होऊ शकतं. म्हणूनच हे दहा नियम तयार केलेत. यांचा अंगिकार केला तर बऱ्याच प्रमाणात आपण आयुष्य समृद्ध करू शकू.

1. ध्येयाविषयी स्पष्टता हवी. नेमकं काय ध्येय आहे. नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट करून मग त्याकडं वाटचाल सुरू करायची. त्यापूर्वी त्या ध्येयापर्यंतचा प्रवास खडतर असेल याची मानसिक तयारी हवी. त्याचबरोबर जे ध्येय ठरवलंय त्यातलं आपल्याला किती येतंय याचाही विचार हवा. हवं तर त्याचं प्रशिक्षण घ्यायचं. आपल्याला जर चांगला ॲथलीट व्हायचंय तर त्यासाठी कोचिंग हवं. मग त्यानुसार व्यायाम करायला हवा. प्रॅक्टिस करायला हवी. त्यांच्या सल्ल्यानुसार स्वत:त सुधारणा करायला हव्यात. सतत शिकत राहायला हवं. मगच हे ॲथलीट व्हायचं ध्येय आपण साध्य करू शकतो.
2. नवं ध्येय ठरवलं की नेहमी पहिला प्रश्न येतो की लोक काय म्हणतील? कारण आपल्याला आपल्या मनापेक्षा दुसरे काय विचार करतील याची चिंता जास्त असते. आपल्याला कुणाचं तरी व्हॅलिडेशन हवं असतं. त्यांना काय वाटेल. आपण चांगला जॉब सोडून म्युझिकमध्ये करियर करायचं म्हणतोय. लोक काय म्हणतील? आपल्याला वेड्यात काढतील. घरच्यांना म्हणतील त्याला जरा समजवा. आता लोक काय म्हणतील हा विचार आपणच करत राहिलो तर लोकांनी काय विचार करायचा? आपण आपल्यापुरता विचार करत राहायचं लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्यायचा.
3. यापाठोपाठ अजून एक गोष्ट येते. ती म्हणजे अतिविचार. मी जर यात यशस्वीच झालो नाही तर? मला हे नवं काम जमलंच नाही तर? मी अर्ध्या वाटेत हे सोडलं तर मग काय करू? जर मी यात यशस्वी झालो तर मग पुढं कसं करायचं? मला कुठं माहिती आहे यातलं काय? आतापर्यंत दहाजण अपयशी ठरलेत. खूप झाला ना विचार? त्यापेक्षा कृती करण्यावर भर द्यायला हवा. कृती केली की विचार येत नाही. कृतीवर लक्ष राहतं.
4. आता स्पर्धेचं युग आहे. त्यामुळं आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात इतरही अनेक जण असणार. प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत राहणार. मग तो पुढं गेला. त्याला माझ्यापेक्षा आधी जमलं. मला का जमलं नाही. सगळ्या जगाला यश मिळतं. मलाच यश मिळत नाही. त्या काल आलेल्या पोरांसमोर मी अगदीच स्लो आहे. आपण जेवढी आपली तुलना इतरांशी करतो तेवढं आपल्याला वाटायला लागतं की आपण त्यांच्यापेक्षा कमी पडतोय. पण गंमत अशी असते की जे व्हा ते त्यांची तुलना आपल्याशी करत असतात, तेव्हा त्यांनाही हेच वाटत असते की ते तुमच्यापेक्षा कमी आहेत. तुलना करायची तर त्यांच्या नजरेतून तुमच्याकडं पाहा. तुम्ही भारी आहात हे तुम्हाला कळेल.
5. आपल्याला सर्वांत आवडती वेळ असते, ती भूतकाळाची नाहीतर भविष्यकाळाची. भूतकाळातल्या अपयशांच्या आठवणीतून आपण बाहेरच येत नाही. पूर्वी शारजाह इथं भारत-पाकिस्तान फायनल झाली तेव्हा जावेद मियांदादनं शेवटच्या चेंडूवर सिक्स मारत भारताकडून मॅच हिसकावली होती. त्यानंतर प्रत्येक वेळी भारत पाकिस्तान समोरासमोर आले की कित्येक वर्षं सगळ्यांना तीच मॅच आठवायची. आपण भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी आठवत नाही. वाईट गोष्टी आठवतो आणि मग आपला पाय आहे तिथंच अडकून राहतो. आपण पुढंच जात नाही. भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात ठेवायला हव्यात.
6. चांगल्या सवयी अंगिकारायला हव्यात – सवय माणसाला घडवते किंवा बिघडवते. आपल्याला अर्थातच आयुष्य घडवायचंय. कारण आपण जेव्हा आयुष्य घडवतो तेव्हा आपल्या एकट्याच्या आयुष्यात बदल होत नाहीत तर आपल्या आख्ख्या कुटुंबाचं आयुष्यही समृद्ध होत असतं आणि हेच आपण जर वाईट काही केलं तर कुटुंबालाही त्या परिस्थितीतून जावं लागतं. चांगल्या सवयी आपल्याला चांगलं आयुष्य देतात. सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ पक्की हवी. व्यायाम, मेडिटेशन, योग्य आहार आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आळसावर मात. या सवयींना आपल्या आयुष्याचा भाग बनवायला हवा.
7. आता नव्यानं सुरूवात केली आहे. तर तो रस्ता तर खडतर असणार. कितीही तयारी केली, प्रशिक्षण घेतलं, काहीही केलं तरी आपल्या अडचणी या नव्यानंच येतात. त्यामुळं त्यांच्यावर मात करूनच पुढं जावं लागतं. लहानपणी आपण नवनीतचं गाईड वापरायचो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यात असायची. त्यातले काही प्रश्न परीक्षेत यायचेसुद्धा. पण काही प्रश्न असे असायचे जे वेगळेच असायचे. त्यांची उत्तरं आपल्याला विचार करूनच लिहायला लागायची. तसंच आहे हे. आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग करून अडचणींवर मात करायची. हरून जायचं नाही.
8. आयुष्यात पैशाचं महत्त्व जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढं चांगलं. कारण, पैशानं सगळी सुखं विकत घेता आली नाहीत तरी पैशानं बरीचशी कामं सोपी होतात. त्यामुळं पैसा भरपूर पाहिजे आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार पैशाचे स्त्रोतही हवेत. केवळ एकाच ठिकाणाहून पैसे येत आहेत असं नको. सेव्हिंग करताना आपले पैसे कसे वाढतील आणि त्यापासून उत्पन्न कसं येईल हे पाहात राहायला हवं. त्यासाठी टारगेट ठेवून पैसे गुंतवायला पाहिजेत. जर तीन वर्षांनी आपल्याला घर घ्यायचंय तर त्याच्या डाऊनपेमेंटसाठीची व्यवस्था आतापासून पाहिजे. म्हणजे त्यावेळी त्रास होत नाही.
9. आपल्या प्रवासात आपल्याला नकारात्मक लोकं खूप भेटतात, भेटतील. ती आपलं मानसिक खच्चीकरण करणार आहेत. त्यांना घाबरून प्रवास अर्धवट सोडून देऊन चालणार नाही. नकारात्मक लोकांची मानसिकता एकदा समजावून घेतली की याच नकारात्मक लोकांचा उपयोग आपण आपल्या प्रगतीसाठी करू शकतो. त्यावर एक व्हिडीओ केलेला आहे. त्याची लिंकही मी इथं देतो. नकारात्मक माणसांमुळं खचून जायचं नाही.
10. आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसं. टॉम क्रूझ हा हॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि त्याचे जगभर फॅन फॉलोइंग आहे. मागची चाळीस वर्षं तो स्टार आहे. हा माणूस सांगतो की मी फार ग्रेट ॲक्टर नाही. पण माझ्या आजूबाजूला चांगले लोक आहेत. मॅनेजर्स, लेखक, दिग्दर्शक हे चांगले असतात. ते त्यांच्या क्राफ्टमध्ये मास्टर असतात. त्यामुळं माझं काम होतं. थोडक्यात काय तर माणसांचं खूप महत्त्व आहे. आपल्या आजूबाजूला चांगल्या माणसांचं नेटवर्क हवं. आपल्या घरचे, आजूबाजूचे, मित्र मैत्रिणी, ऑफिसमधले सहकारी, व्यवसायातले सप्लायर्स, कस्टमर्स.... चांगल्या लोकांचं नेटवर्क मजबूत असलं की मग कसलंच टेन्शन नसतं.
आता हे १० नियम झाले की ज्यामुळं आयुष्य बदलायला मदत होईल. पण मग याची सुरूवात कधी करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. योग्य वेळ कुठली निवडता येईल असं तुमच्या डोक्यात सुरू असेल तर थांबा. आता सुरू करा. हीच वेळ सर्वोत्तम आहे. मला आतापर्यंतच्या आयुष्यात एक कळलंय की योग्य वेळ कधीच येत नाही. जेव्हा आपण सुरूवात करतो तीच वेळ सर्वोत्तम असते. त्यामुळं आजच सुरूवात करायची. हीच वेळ सर्वोत्तम.



Comments